Thursday, September 17, 2020
Ajji- My S'hero'!!
माझी आज्जी- My S'hero'!!!
आज्जी .. हे नातंच जगात भारी आहे. त्यातून माझी आज्जी हि एकदम टिपिकल आज्जीच्या परिभाषेत बसणारी!! लहान मुलांमध्ये भलतीच पॉप्युलर! कारण ती पत्त्यांचे वेगवेगळे गेम्स खेळते आणि महत्वाचा म्हणजे ती मुलांना जिंकू देते (हि पत्ते परंपरा अगदी माझ्या मुलांनीही सांभाळली आहे. मिरजेला गेलं कि श्लोक लग्गेच पत्ते घेऊन पणजीच्या खोलीत जातो. आणि आता गाथा सुध्दा भिकार-सावकार मध्ये expert झाली आहे)!
मी लहान असताना दर शनिवारी शाळा सुटली कि भराभर एका पिशवीत कपडे कोंबायचे आणि दुधाच्या टेम्पोत बसून म्हैसाळला तुझ्याकडे यायचे. आणि एकदा तिकडे आले, कि मग आपली धमाल सुरु. दिवसभर पत्ते खेळणे आणि मग रात्री झोपताना गोष्टी ऐकणे हे मेन उद्देश. रविवारी दिवसभर तुझ्या मागे-पुढे करण्यात, 'आज्जी मी भांडी घासते, आज्जी मी पूजा करते' अशी लुडबुड करण्यातच सगळा वेळ जायचा. दुपारी तुझे कपाट उघडून त्यातली नवीन साबणे, पावडरीची डबे, सुषमाआत्यानी कॅनडा हुन आणलेले wet-wipes , चमचे- वाट्या, आणि अशा असंख्य छान छान गोष्टी घेऊन मी खेळायचे. आणि मग हळूच , " आज्जी, माझ्या कडे हा साबण नाहीये ग!! मी घेऊ का?" अशी बोळवण करून घ्यायचे. तेव्हा तू मला गालात हसू आवरत, सगळं भरून द्यायचीस. संध्याकाळी मिरजेला जाताना माझे डबडबलेले डोळे पुसून समजूत काढायचीस. तू बाहेर कुठेही निघालीस के मी चप्पल घालून तुझ्यामागून शेपूट म्हणून सगळीकडे सारखी जायचे.
जरा मोठी झाले आणि मग कन्या शाळेत, शाळेची चेयरमन म्हणून तू शाळेत आलीस कि सगळ्या मैत्रिणी- 'धनु sss ,तुझी आज्जी, तुझी आज्जी' असा सांगायला यायच्या. पण याचा तू कधी मला गर्व चढू दिला नाहीस. 'विजयाबाईंची नात' अशी विशेष वजनदार ओळख असली तरी 'धनश्री देवल' हि माझी स्वतःची ओळख शाळेत निर्माण करणे कसा गरजेचे आहे, हे ना सांगता जाणीव करून दिलीस.
८ बहिणींमध्ये थोरली, 'ताई' , तासगाव सारख्या छोट्या गावातून सांगलीला शिकायला आली. लग्नानंतर सुध्दा हिकमतीने BA आणि लहान मुलांना सांभाळत MA करणे काही सोपे काम नव्हते. तरीही तू जिद्दीने आणि आजोबांच्या सार्थ पाठिंब्याने पुढे शिकत राहिलीस. भाषेवरचे प्रभृत्व आणि खणखणीत आवाजाबरोबरच विचारांची श्रीमन्ती लाभलेली.. 'चूल आणि मूल' हेच स्त्री चे विश्व समजण्याऱ्या त्या काळात भलतीच सुधारमतवादी होतीस तू! मुलींना कार चालवायला यायला हवीच आणि ती दुरुस्त पण करता यायला हवी हे तुझे ठाम मत! सिंगापुर, कॅनडा, अमेरिकाफिरून आलेली..पण साडी सोडून गाऊन सुध्दा घालायला नकार! शाळेची चेयरमन, महिलामंडळाची अध्यक्ष, ब्रिज खेळणारी, मंडळात भाषणे करणारी, शाळेत संस्कृत शिकवणारी, तिन्ही मुलींना संपूर्ण स्वातंत्र्य देणारी ओपन माईंडेड आजी घरात असताना, माझं फेमिनिस्ट आणि फ्री-स्पिरिटेड होणं साहजिकच होतं. त्याच हट्टाने मी पुण्याला शिकायला गेले तोपर्यंत वयासोबत तुझी काळजी करायची सवय पण वाढत गेली.
..आणि तसंच मनासारखं मरणही मिळवलंस तू.. हॉस्पिटल मध्ये भरती व्हायची वेळसुध्दा आणू दिली नाहीस. राहत्या घरीच बाबा शेजारी असताना शेवटचा श्वास घेतलास.. आणि ठेवून गेलीस न संपण्याऱ्या आठवणींची डोंगर!!
आज्जी तू खरंच awesome होतीस ग.. माझी S'hero' !!!
तुझी लाडकी -धनी
Friday, September 11, 2020
संवाद
“ओळखलंस का गं मला?” म्हणून मेसेज केला कोणी
माणसे तीच जुनी पण ओळख होतेय नव्यानी
क्षणभर केला विचार, कुणी काही का म्हणेना
सगळ्यांशी मी बोलणार, मग विषय काही का असेना
विसरूनच गेलीस आम्हाला, आज कसे आक्रीत घडले?
मैत्रिणीने केले कौतुक तर आज्जीने लाडीक रागेही भरले
दारी संकट .. कामेही बिकट.. सर्वांची घरीच नांदी
छंद जोपासले कुणी तर कुणी केली धुणी-भांडी
कोणाशी शाळेच्या गप्पा तर कोणाशी मुला-बाळांच्या
रूटीनच्या ओझ्याखाली गाडल्या गेलेल्या आशा-आकांक्षाच्या
दूरावल्या बेटांमधे आठवणींचे पूल बांधू पहातेय
सुख-दुःख-राग-प्रेम-माया सर्वांचीच वाटणी होतेय
दुसरयांच्या आयुष्यात डोकावण्यात माझाच स्वार्थ दाटला
स्वत:च्या परीघात राहताना, जरा एकटेपणा वाटला
दुरावल्या भेटीगाठी तरी संवादही नसे उणा
फोन/ई-मेल/मेसेज करून नुसते ‘Hi’ म्हणा!!!
Disclaimer-कुसुमाग्रजांची नम्र माफी मागून मांडलेले मज पामराचे विचार!!
Sunday, August 23, 2020
सी.ना.ची गच्ची
Thursday, July 30, 2020
चलते - चलते !!
पार्क मधल्या पायवाटांवरून तुरळक
माणसं लगबगीनं चालत जात असतात. उन्हाळ्यात हे पार्क नुसतं माणसांनी फुलून गेलेलं
असायचं . सगळी कडे पिकनिकस ची आणि फोटो सेशन्स करणाऱ्या माणसांची रेलचेल असायची.
स्टेशन मधून बाहेर पडला कि pram घेऊन निवांत फिरणाऱ्या लोकांमधून,धावपळ करणाऱ्या
लहानमुलांना चुकवत जाताना वाटायचं कि 'काय मजा आहे यांची!! आणि मी बघा .. ऑफिस ला
जातीये !!!'. पण आता सुट्ट्या संपल्या, शाळा सुरु झाल्यात त्यामुळे गर्दी एकदम कमी
झालीये . सप्टेंबर महिना सुरु झाला कि हे चित्र असंच एकदम पालटत. त्या गर्दीची आठवण
काढत मी डावीकडे वळते आणि सेन्ट जेम्स'स पॅलेस बाजूच्या रस्त्यावरून चालू लागते. हा
रस्ता फारच सुंदर आहे. डावी कडे अतिशय सुरेख स्थापत्यकला असलेल्या जुन्या इमारती
आणि उजवीकडे त्याहूनही जुने आणि भव्य असे प्लेन ट्री वृक्ष. त्या प्रचंड वृक्षांना
पाहीलं कि मला पडवीत पेपर वाचत बसलेल्या, थकलेल्या तरीही टवटवीत चेहेऱ्याच्या आजोबा
लोकांची आठवण येते. तशाच मायेने आजूबाजूला चालेल्या कोलाहलाकडे स्थितप्रद्न्य पणे
पाहत बसलेले! शरद ऋतूची चाहूल सुरु होतेय. अनेक पानांनी आपला रंग बदललाय. आधीच्या
हिरव्या रांगामध्येच केशरी-पिवळ्या-जांभळ्या छटाही दिसू लागल्यात.
हि माझी अगदी लाडकी जागा.
तिथे गेल्याक्षणी मी सगळी गडबड आणि टेन्शन्स विसरूनच जाते . या छोट्याश्या पार्क
मध्ये खूप काही बघण्यासारखा आहे. छोटासा तलाव, त्यात थाई थाई नाचणारी कारंजी , त्यावरचा तो परिकथेतल्या सारखा छोटासाच पण ऐटदार पूल आणि बॅकग्राऊंड म्युझिकला पक्षांचा गोड चिवचिवाट. तलावात खूप सारी बदके , पेलिकन्स , राजहंस अगदी मनसोक्त डुंबत असतात . जॉगिंग करणारी माणसे ओळखीची नसली तरी हसून - गुड मॉर्निंग म्हणून पुढे जातात. खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या वातावरणात!
मी एका मोठ्ठ्या श्वासात ती
स्वच्छ हवा आणि vibe भरून घेते. पार्क कॅफे नुकताच ओपन होत असतो. तिथल्या कॉफी आणि
पेस्ट्रीज च्या वासाने एकदम भूक चाळवाते. पण त्या मोहाच्या क्षणावर मात करून मी गेट
मधून बाहेर पडते . आता एक-एक शासकीय इमारती येऊ लागतात. पुन्हा काळ्या कोटातल्या
लोकांची लगबग दिसू लागते. मी आपली एखाद्या स्वप्नातून जागे व्हावे तशी भानावर येते.
आणी दिवसभराच्या कामांची उजळणी करत चॅनेल४ च्या ऑफिस च्या पायऱ्या चढू लागते.



