सकाळी ८:४२ ला खचाखच भरलेल्या ज्युबिली लाइन (हो.. लंडन मध्ये सुध्दा आजकाल मुंबई
लोकल सारखी गर्दी असते ऑफिस अवर्स मध्ये) मधून मी ग्रीन पार्क स्टेशन ला कशीबशी
बाहेर पडते. आणि डोक्यात दिवसभरच्या कामांची उजळणी करत आपल्याच तंद्रीत गर्दीच्या
लोंढ्याबरोबर आपोआप एस्कलेटर च्या दिशेने चालू लागते. मेन हॉल मध्ये पोहोचताना
डावीकडून पिकॅडिली लाइन च्या लोकांचा जथ्था आमच्या गर्दीत मिसळू पाहतो आणि मग गेट
मधून बाहेर जाण्यासाठी एकच गर्दी उडते . अतिशय सभ्य रीतीने पण आक्रमक आवेशात लोकं
लाइन लावतात. त्यातून पर्यटकांची गर्दी असेल तर तेव्हाचे हाल तर विशेष बघण्यासारखे
असतात. अत्यंत गोंधळलेल्या चेहऱ्याने आणि काहीश्या केविलवाण्या नजरेने कुठल्या
एक्सिट ने बाहेर पडायचं अशा विचारात हरवलेले व्हिसिटर्स जेव्हा लंडनकरांच्या
रस्त्यात घुटमळतात तेव्हा त्यांना बसणाऱ्या शिव्याशापांची त्यांना जाणीवही नसते आणि
पर्वाही ... या सगळ्या गदारोळातून कार्ड टॅप करून गेट मधून बाहेर पडताना हिरवा दिवा
पहिला कि मला अजूनही सुटकेचा निश्वास टाकावंसं वाटतं. नाहीतर पुन्हा ट्यूब च्या
स्थितप्रज्ञ कर्मचाऱ्याला शोधून, 'कार्ड टॅप झाला कि नाही ते बघा ओ जरा ' अशी आळवणी
करून, मागून येणाऱ्या लोकांच्या सभ्य नजरेतील शिव्या खात आणखी ५ मिनिटं खर्ची घालणं
आलं! बकिंगहॅम पॅलेस गार्डन च्या एक्सिट मधून बाहेर पडताना मला आपण एखाद्या
उंदीराप्रमाणे बिळातून बाहेर येत आहोत असा वाटतं.तसाही काळे कोट आणि जॅकेट्स
मधली,ऑफिस च्या दिशेने लगबगीने धावणारी माणसे उन्दिरांच्या सारखीच दिसत आहेत या
विचाराने मी स्वतःशीच हसते. पण बाहेर आल्या क्षणी एकदम ऍलिस ला जसं बिळातून बाहेर
पडल्यावर एकदम वेगळ्याच जगात आल्यासारखा वाटलं असेल तसं वाटतं. फ्रेश हवेचा झोका
आला कि गर्दीच्या वासांनी त्रासलेल्या नाकाला तरतरी येते. आणि समोरच्या वॉटर फाऊंटन
कडेपाहताना तर एकदम जग बिग काय ते सगळं एकदम थांबल्यासारखा वाटायला लागतं.
नुकताच पाऊस पडून गेलेला असतो. झकास ऊन पडलंय. ग्रीन पार्क च्या प्रशस्त
लॉनच्या हिरव्यागार चादरीवर दवबिंदू चमकत असतात.

एखादे चुकार पान
हळुवार वाऱ्याच्या झुळुकेनीही अलगद जमिनीवर पडते.
आणि त्याच्या चाहुलीने मोठ्ठ्या
ऐटीत बसून Nut खाणाऱी खारुताई एकदम चौकस होते . लंडन च्या पार्क्स मधल्या या खारी
भारीच धीट. चांगल्या खात्या घरच्या म्हणाव्यात अशा धष्ट-पुष्ट. आपल्या झुबकेदार
शेपट्या सावरीत इकडून तिकडे धावत असतात. फोटो साठी मस्त pose देण्यासाठी प्रसिद्ध
आणि कुणी खाणे देण्यासाठी हात पुढे केला तर सराईतपणे हातावर चालून खाऊ खातात. त्या
खारोटीची मजा पाहत मी मी चालता चालता मॉल रोड वर पोहोचते . उजवीकडे बकिंगहॅम पॅलेस
मोठ्या दिमाखात उभा असतो. ‘आत्ता वेळ नाहीये , नंतर भेटू’ असा क्विन ला सांगावे
लागेल , असा विचार करत मनाशीच हसते . पॅलेस वर नजर टाकीत आणि डावीकडून येणाऱ्या
गाडयांना चुकवीत मी सेंट जेम्स’स् पार्क मध्ये शिरते.

