Sunday, August 23, 2020

सी.ना.ची गच्ची

     माझ्या आजोळ चे जुनं घर, म्हणजे वखार भागातला वाडा. सख्ख्या-चुलत अशा ३०-४० माणसांचे एकत्र कुटुंब.यथावकाश तो पाडून तिथेभव्य अशी सीता- नारायण निवास हि टोलेगंज वास्तू उभी राहिली ( गम्मत म्हंजे हे घर नवीन बांधून झाला तरी त्याला जुनं घर असच नाव तोंडात येत.)आणि याला साजेशी अशी ऐसपैस अन मस्त आहे ती त्याची गच्ची!! प्रत्येकाचे वेगळे घर झाले तरी सर्वाना एकत्र बांधणारा धागा!!

     ५ मजले चढून धापा टाकत वर पोहोचले कि जे दृश्य दिसतं ते मात्र अफलातून आहे. आजूबाजूच्या इमारतींचे छत, सांगलीच्या गणपतीमंदिराचा कळस, डावीकडे BSNL चा टॉवर, उजव्या बाजूला नजर जाईल तिथे पर्यंत शेतजमीनी, आणि वर अमर्याद असे आकाश!! ३.५ फुटी कठड्याजवळ जाऊन खाली वाकून बघितलं की नक्की घेरी येणार!! कृष्णेला पूर आला म्हणजे आमच्या गच्चीमधून पद्माटाॅकीजच्या मागे ओतातले पाणी बघायला पण मिळते. आम्ही सगळी आत्ये- मामे- मावस भावंडं म्हणजे वानरसेना त्यात माझ्यासगळ्यात धाकट्या मावशीपासून, सर्वात मोठ्या भाचीपर्यंत सगळे सामील.. हि गच्ची म्हणजे आम्हा मुलांचा हक्काचा पार्टी हॉल ,क्रिकेटग्राउंड, कॅम्पिंग साईट, डान्स फ्लोअर असा सगळं काही! दिवसभर माझे सगळे मामे भाऊ मिळून क्रिकेट खेळत असायचे. आणि जर बॉल चुकून खाली गेला कि मग तो पाचव्या मजल्यावरच्या गच्ची वर फेकू शकेल अशा बकऱ्याची शोधाशोध सुरु. मग एखादा असा म्याड यायचा. आणि त्याची बॉल शोधून पाच मजले उंचीवर फेकताना होणारी तारांबळ पाहताना आमची हसून हसून पुरेवाट व्हायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारभर पट्ट्यांचा डाव रंगत असे..आणि मग उन्हे मावळू लागली कि सगळी वानरसेना गच्चीत.. संकट साखळी, विष-अमृत, खो-खो असे सगळे खेळ सुरु होत. डोळ्यात बोट घालून सुध्दा दिसणार नाही असा अंधार पडला कि मग तिथेच गोल करून गप्पांचा पट रंगात असे.त्यात भूत-खेतांच्या गोष्टी खासच. रात्री ची जेवणे उरकली कि पुन्हा गच्ची मधेच अंथरुणांची मांडा-मांड सुरु. आणि मग खरी पंचाईत व्हायची ती कोण कुठे झोपणार वादावरून. कारण इतक्या अंधारात आणि भुताच्या गोष्टी ऐकल्यावर तर कुणालाच कडेला झोपायचे नसे!

    एकदा असेच खेळताना,अगदी अटीतटीच्या क्षणी मी प्रसन्न दादाला साखळी द्यायला गेले आणि त्याचवेळी त्याच्या धक्क्याने जोरात हवेत उडाले. गच्चीच्या कठड्यावरून ४ बोटे उंचावरून पुन्हा आत येऊन धाडकन गच्चीच्या जमिनीवर कोसळले होते. जब्बरदस्त मुका मार लागला होता अंगाला.. आणि सगळ्या सगळ्यांची जाम हवा टाइट झाली होती. तेवढ्यात कोणीतरी खाली जाऊन आई ला सांगितलं कि धनू गच्ची वरून पडता -पडता वाचली.आई चा शॉकने  आणि काळजीने पारा चढला होता. "पुन्हा या गच्चीत गेलीस तर तंगडं तोडून ठेवेन" अशी धमकी मिळाल्यावर, त्यानंतर चे काही महिने केवळ आईच्या भीतीने मी गच्चीत पाउल ठेवलं नव्हतं . 

याच गच्चीत, स्कॉलरशिप परीक्षेत दोघींचा नंबर आल्यावर, मी आणि प्रियांकाने जोरात ओरडून/ किंचाळून जग जिंकल्या सारखा आनंदव्यक्त केला होता. ती पावसाळी संध्याकाळ आणि आमचा तो गगनात न मावणारा हर्षवायू माझ्या आठवणीत अगदी कोरून ठेवलेलाआहे. महिन्या- दोन महिन्यातून एकदा गच्चीत डब्बा पार्टी ( म्हणजे ज्याला इथे लंडन ला आम्ही Potluck party म्हणतो ) होत असे. सगळे कुटुंब मिळून गप्पा मारत, गेम्स खेळत जेवणे करी असू. आणि जेवण झालं कि मग तिथेच डान्स पार्टी सुरु होत असे. गणपतीडान्स हा आमचा वीक पॉईंट! रंगपंचमीला तर बहार असे. अंघोळी पुरते पाणी काढून ठेवून गच्चीच्या वर असणाऱ्या पाण्याच्या अख्ख्या टाकीतच 
रंग मिसळून देण्यात येई. आणि मग पार आजी-आजोबां पासून घरातल्या लहानग्या बाळापर्यंत सगळे रंग खेळण्यात सहभागीहोत. कुमारमामाचा साखरपुडा, माझी सातवीतली बर्थडे पार्टी असे अनेक छोटे मोठे समारंभ या गच्चीतच साजरे झाले आहेत. माझ्या पुण्याच्या मैत्रिणी सुट्टीला आमच्याकडे आल्यावर सांगलीदर्शन मधे गच्ची पण होती. संध्याकाळी सूर्यास्ताचे गहिरे होत जाणारे रंग बघत मारलेल्या गप्पा अजूनही ताज्या आहेत.

    आता सगळी भावंडं मोठी झालीत. शिक्षण-नोकरीच्या उद्देशाने बाहेरगावी सेटल झालीत. जुन्या घरी आता वयस्क झालेली पण तरीगुण्या गोविंदाने राहणारी मामा-मामीची पिढी आहे. त्यांना गेल्या वर्षीचा महापूर आणि यावर्षी कोरोनात पण मोकळा श्वास घ्यायला अनव्यायामाला आधार तो गच्चीचाच! 

    आता मिरजला गेले कि त्यांना भेटायला जुन्या घरी कधीमधी जाणं होतं. मोठ्या आपुलकीनं माझा स्वागत होतं. मायेनं कोडकौतुक होतं, जिव्हाळ्यानं चौकशी होते. मी या गच्चीत माझ्या मुलांना घेऊन जाते. आणि सनसेट दाखवते. तिथल्या गार वाऱ्यात , अमर्याद आसमंतात आजूबाजूला बघताना मधली वर्षे सरलेली असतात. तीच गच्ची, तोच सूर्यास्त आणि तेच आकाश आणि तीच मी!!