Showing posts with label Random Stories. Show all posts
Showing posts with label Random Stories. Show all posts

Sunday, August 23, 2020

सी.ना.ची गच्ची

     माझ्या आजोळ चे जुनं घर, म्हणजे वखार भागातला वाडा. सख्ख्या-चुलत अशा ३०-४० माणसांचे एकत्र कुटुंब.यथावकाश तो पाडून तिथेभव्य अशी सीता- नारायण निवास हि टोलेगंज वास्तू उभी राहिली ( गम्मत म्हंजे हे घर नवीन बांधून झाला तरी त्याला जुनं घर असच नाव तोंडात येत.)आणि याला साजेशी अशी ऐसपैस अन मस्त आहे ती त्याची गच्ची!! प्रत्येकाचे वेगळे घर झाले तरी सर्वाना एकत्र बांधणारा धागा!!

     ५ मजले चढून धापा टाकत वर पोहोचले कि जे दृश्य दिसतं ते मात्र अफलातून आहे. आजूबाजूच्या इमारतींचे छत, सांगलीच्या गणपतीमंदिराचा कळस, डावीकडे BSNL चा टॉवर, उजव्या बाजूला नजर जाईल तिथे पर्यंत शेतजमीनी, आणि वर अमर्याद असे आकाश!! ३.५ फुटी कठड्याजवळ जाऊन खाली वाकून बघितलं की नक्की घेरी येणार!! कृष्णेला पूर आला म्हणजे आमच्या गच्चीमधून पद्माटाॅकीजच्या मागे ओतातले पाणी बघायला पण मिळते. आम्ही सगळी आत्ये- मामे- मावस भावंडं म्हणजे वानरसेना त्यात माझ्यासगळ्यात धाकट्या मावशीपासून, सर्वात मोठ्या भाचीपर्यंत सगळे सामील.. हि गच्ची म्हणजे आम्हा मुलांचा हक्काचा पार्टी हॉल ,क्रिकेटग्राउंड, कॅम्पिंग साईट, डान्स फ्लोअर असा सगळं काही! दिवसभर माझे सगळे मामे भाऊ मिळून क्रिकेट खेळत असायचे. आणि जर बॉल चुकून खाली गेला कि मग तो पाचव्या मजल्यावरच्या गच्ची वर फेकू शकेल अशा बकऱ्याची शोधाशोध सुरु. मग एखादा असा म्याड यायचा. आणि त्याची बॉल शोधून पाच मजले उंचीवर फेकताना होणारी तारांबळ पाहताना आमची हसून हसून पुरेवाट व्हायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारभर पट्ट्यांचा डाव रंगत असे..आणि मग उन्हे मावळू लागली कि सगळी वानरसेना गच्चीत.. संकट साखळी, विष-अमृत, खो-खो असे सगळे खेळ सुरु होत. डोळ्यात बोट घालून सुध्दा दिसणार नाही असा अंधार पडला कि मग तिथेच गोल करून गप्पांचा पट रंगात असे.त्यात भूत-खेतांच्या गोष्टी खासच. रात्री ची जेवणे उरकली कि पुन्हा गच्ची मधेच अंथरुणांची मांडा-मांड सुरु. आणि मग खरी पंचाईत व्हायची ती कोण कुठे झोपणार वादावरून. कारण इतक्या अंधारात आणि भुताच्या गोष्टी ऐकल्यावर तर कुणालाच कडेला झोपायचे नसे!

    एकदा असेच खेळताना,अगदी अटीतटीच्या क्षणी मी प्रसन्न दादाला साखळी द्यायला गेले आणि त्याचवेळी त्याच्या धक्क्याने जोरात हवेत उडाले. गच्चीच्या कठड्यावरून ४ बोटे उंचावरून पुन्हा आत येऊन धाडकन गच्चीच्या जमिनीवर कोसळले होते. जब्बरदस्त मुका मार लागला होता अंगाला.. आणि सगळ्या सगळ्यांची जाम हवा टाइट झाली होती. तेवढ्यात कोणीतरी खाली जाऊन आई ला सांगितलं कि धनू गच्ची वरून पडता -पडता वाचली.आई चा शॉकने  आणि काळजीने पारा चढला होता. "पुन्हा या गच्चीत गेलीस तर तंगडं तोडून ठेवेन" अशी धमकी मिळाल्यावर, त्यानंतर चे काही महिने केवळ आईच्या भीतीने मी गच्चीत पाउल ठेवलं नव्हतं . 

याच गच्चीत, स्कॉलरशिप परीक्षेत दोघींचा नंबर आल्यावर, मी आणि प्रियांकाने जोरात ओरडून/ किंचाळून जग जिंकल्या सारखा आनंदव्यक्त केला होता. ती पावसाळी संध्याकाळ आणि आमचा तो गगनात न मावणारा हर्षवायू माझ्या आठवणीत अगदी कोरून ठेवलेलाआहे. महिन्या- दोन महिन्यातून एकदा गच्चीत डब्बा पार्टी ( म्हणजे ज्याला इथे लंडन ला आम्ही Potluck party म्हणतो ) होत असे. सगळे कुटुंब मिळून गप्पा मारत, गेम्स खेळत जेवणे करी असू. आणि जेवण झालं कि मग तिथेच डान्स पार्टी सुरु होत असे. गणपतीडान्स हा आमचा वीक पॉईंट! रंगपंचमीला तर बहार असे. अंघोळी पुरते पाणी काढून ठेवून गच्चीच्या वर असणाऱ्या पाण्याच्या अख्ख्या टाकीतच 
रंग मिसळून देण्यात येई. आणि मग पार आजी-आजोबां पासून घरातल्या लहानग्या बाळापर्यंत सगळे रंग खेळण्यात सहभागीहोत. कुमारमामाचा साखरपुडा, माझी सातवीतली बर्थडे पार्टी असे अनेक छोटे मोठे समारंभ या गच्चीतच साजरे झाले आहेत. माझ्या पुण्याच्या मैत्रिणी सुट्टीला आमच्याकडे आल्यावर सांगलीदर्शन मधे गच्ची पण होती. संध्याकाळी सूर्यास्ताचे गहिरे होत जाणारे रंग बघत मारलेल्या गप्पा अजूनही ताज्या आहेत.

    आता सगळी भावंडं मोठी झालीत. शिक्षण-नोकरीच्या उद्देशाने बाहेरगावी सेटल झालीत. जुन्या घरी आता वयस्क झालेली पण तरीगुण्या गोविंदाने राहणारी मामा-मामीची पिढी आहे. त्यांना गेल्या वर्षीचा महापूर आणि यावर्षी कोरोनात पण मोकळा श्वास घ्यायला अनव्यायामाला आधार तो गच्चीचाच! 

    आता मिरजला गेले कि त्यांना भेटायला जुन्या घरी कधीमधी जाणं होतं. मोठ्या आपुलकीनं माझा स्वागत होतं. मायेनं कोडकौतुक होतं, जिव्हाळ्यानं चौकशी होते. मी या गच्चीत माझ्या मुलांना घेऊन जाते. आणि सनसेट दाखवते. तिथल्या गार वाऱ्यात , अमर्याद आसमंतात आजूबाजूला बघताना मधली वर्षे सरलेली असतात. तीच गच्ची, तोच सूर्यास्त आणि तेच आकाश आणि तीच मी!! 

Thursday, July 30, 2020

चलते - चलते !!

    सकाळी ८:४२ ला खचाखच भरलेल्या ज्युबिली लाइन (हो.. लंडन मध्ये सुध्दा आजकाल मुंबई लोकल सारखी गर्दी असते ऑफिस अवर्स मध्ये) मधून मी ग्रीन पार्क स्टेशन ला कशीबशी बाहेर पडते. आणि डोक्यात दिवसभरच्या कामांची उजळणी करत आपल्याच तंद्रीत गर्दीच्या लोंढ्याबरोबर आपोआप एस्कलेटर च्या दिशेने चालू लागते. मेन हॉल मध्ये पोहोचताना डावीकडून पिकॅडिली लाइन च्या लोकांचा जथ्था आमच्या गर्दीत मिसळू पाहतो आणि मग गेट मधून बाहेर जाण्यासाठी एकच गर्दी उडते . अतिशय सभ्य रीतीने पण आक्रमक आवेशात लोकं लाइन लावतात. त्यातून पर्यटकांची गर्दी असेल तर तेव्हाचे हाल तर विशेष बघण्यासारखे असतात. अत्यंत गोंधळलेल्या चेहऱ्याने आणि काहीश्या केविलवाण्या नजरेने कुठल्या एक्सिट ने बाहेर पडायचं अशा विचारात हरवलेले व्हिसिटर्स जेव्हा लंडनकरांच्या रस्त्यात घुटमळतात तेव्हा त्यांना बसणाऱ्या शिव्याशापांची त्यांना जाणीवही नसते आणि पर्वाही ... या सगळ्या गदारोळातून कार्ड टॅप करून गेट मधून बाहेर पडताना हिरवा दिवा पहिला कि मला अजूनही सुटकेचा निश्वास टाकावंसं वाटतं. नाहीतर पुन्हा ट्यूब च्या स्थितप्रज्ञ कर्मचाऱ्याला शोधून, 'कार्ड टॅप झाला कि नाही ते बघा ओ जरा ' अशी आळवणी करून, मागून येणाऱ्या लोकांच्या सभ्य नजरेतील शिव्या खात आणखी ५ मिनिटं खर्ची घालणं आलं! बकिंगहॅम पॅलेस गार्डन च्या एक्सिट मधून बाहेर पडताना मला आपण एखाद्या उंदीराप्रमाणे बिळातून बाहेर येत आहोत असा वाटतं.तसाही काळे कोट आणि जॅकेट्स मधली,ऑफिस च्या दिशेने लगबगीने धावणारी माणसे उन्दिरांच्या सारखीच दिसत आहेत या विचाराने मी स्वतःशीच हसते. पण बाहेर आल्या क्षणी एकदम ऍलिस ला जसं बिळातून बाहेर पडल्यावर एकदम वेगळ्याच जगात आल्यासारखा वाटलं असेल तसं वाटतं. फ्रेश हवेचा झोका आला कि गर्दीच्या वासांनी त्रासलेल्या नाकाला तरतरी येते. आणि समोरच्या वॉटर फाऊंटन कडेपाहताना तर एकदम जग बिग काय ते सगळं एकदम थांबल्यासारखा वाटायला लागतं.
 

नुकताच पाऊस पडून गेलेला असतो. झकास ऊन पडलंय. ग्रीन पार्क च्या प्रशस्त लॉनच्या हिरव्यागार चादरीवर दवबिंदू चमकत असतात. 
    पार्क मधल्या पायवाटांवरून तुरळक माणसं लगबगीनं चालत जात असतात. उन्हाळ्यात हे पार्क नुसतं माणसांनी फुलून गेलेलं असायचं . सगळी कडे पिकनिकस ची आणि फोटो सेशन्स करणाऱ्या माणसांची रेलचेल असायची. स्टेशन मधून बाहेर पडला कि pram घेऊन निवांत फिरणाऱ्या लोकांमधून,धावपळ करणाऱ्या लहानमुलांना चुकवत जाताना वाटायचं कि 'काय मजा आहे यांची!! आणि मी बघा .. ऑफिस ला जातीये !!!'. पण आता सुट्ट्या संपल्या, शाळा सुरु झाल्यात त्यामुळे गर्दी एकदम कमी झालीये . सप्टेंबर महिना सुरु झाला कि हे चित्र असंच एकदम पालटत. त्या गर्दीची आठवण काढत मी डावीकडे वळते आणि सेन्ट जेम्स'स पॅलेस बाजूच्या रस्त्यावरून चालू लागते. हा रस्ता फारच सुंदर आहे. डावी कडे अतिशय सुरेख स्थापत्यकला असलेल्या जुन्या इमारती आणि उजवीकडे त्याहूनही जुने आणि भव्य असे प्लेन ट्री वृक्ष. त्या प्रचंड वृक्षांना पाहीलं कि मला पडवीत पेपर वाचत बसलेल्या, थकलेल्या तरीही टवटवीत चेहेऱ्याच्या आजोबा लोकांची आठवण येते. तशाच मायेने आजूबाजूला चालेल्या कोलाहलाकडे स्थितप्रद्न्य पणे पाहत बसलेले! शरद ऋतूची चाहूल सुरु होतेय. अनेक पानांनी आपला रंग बदललाय. आधीच्या हिरव्या रांगामध्येच केशरी-पिवळ्या-जांभळ्या छटाही दिसू लागल्यात. 

एखादे चुकार पान हळुवार वाऱ्याच्या झुळुकेनीही अलगद जमिनीवर पडते.
 आणि त्याच्या चाहुलीने मोठ्ठ्या ऐटीत बसून Nut खाणाऱी खारुताई एकदम चौकस होते . लंडन च्या पार्क्स मधल्या या खारी भारीच धीट. चांगल्या खात्या घरच्या म्हणाव्यात अशा धष्ट-पुष्ट. आपल्या झुबकेदार शेपट्या सावरीत इकडून तिकडे धावत असतात. फोटो साठी मस्त pose देण्यासाठी प्रसिद्ध आणि कुणी खाणे देण्यासाठी हात पुढे केला तर सराईतपणे हातावर चालून खाऊ खातात. त्या खारोटीची मजा पाहत मी मी चालता चालता मॉल रोड वर पोहोचते . उजवीकडे बकिंगहॅम पॅलेस मोठ्या दिमाखात उभा असतो. ‘आत्ता वेळ नाहीये , नंतर भेटू’ असा क्विन ला सांगावे लागेल , असा विचार करत मनाशीच हसते . पॅलेस वर नजर टाकीत आणि डावीकडून येणाऱ्या गाडयांना चुकवीत मी सेंट जेम्स’स् पार्क मध्ये शिरते.


हि माझी अगदी लाडकी जागा. तिथे गेल्याक्षणी मी सगळी गडबड आणि टेन्शन्स विसरूनच जाते . या छोट्याश्या पार्क मध्ये खूप काही बघण्यासारखा आहे. छोटासा तलाव, त्यात थाई थाई नाचणारी कारंजी , त्यावरचा तो परिकथेतल्या सारखा छोटासाच पण ऐटदार पूल आणि बॅकग्राऊंड म्युझिकला पक्षांचा गोड चिवचिवाट. तलावात खूप सारी बदके , पेलिकन्स , राजहंस अगदी मनसोक्त डुंबत असतात . जॉगिंग करणारी माणसे ओळखीची नसली तरी हसून - गुड मॉर्निंग म्हणून पुढे जातात. खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या वातावरणात!


 मी एका मोठ्ठ्या श्वासात ती स्वच्छ हवा आणि vibe भरून घेते. पार्क कॅफे नुकताच ओपन होत असतो. तिथल्या कॉफी आणि पेस्ट्रीज च्या वासाने एकदम भूक चाळवाते. पण त्या मोहाच्या क्षणावर मात करून मी गेट मधून बाहेर पडते . आता एक-एक शासकीय इमारती येऊ लागतात. पुन्हा काळ्या कोटातल्या लोकांची लगबग दिसू लागते. मी आपली एखाद्या स्वप्नातून जागे व्हावे तशी भानावर येते. आणी दिवसभराच्या कामांची उजळणी करत चॅनेल४ च्या ऑफिस च्या पायऱ्या चढू लागते.