सकाळी ८:४२ ला खचाखच भरलेल्या ज्युबिली लाइन (हो.. लंडन मध्ये सुध्दा आजकाल मुंबई
लोकल सारखी गर्दी असते ऑफिस अवर्स मध्ये) मधून मी ग्रीन पार्क स्टेशन ला कशीबशी
बाहेर पडते. आणि डोक्यात दिवसभरच्या कामांची उजळणी करत आपल्याच तंद्रीत गर्दीच्या
लोंढ्याबरोबर आपोआप एस्कलेटर च्या दिशेने चालू लागते. मेन हॉल मध्ये पोहोचताना
डावीकडून पिकॅडिली लाइन च्या लोकांचा जथ्था आमच्या गर्दीत मिसळू पाहतो आणि मग गेट
मधून बाहेर जाण्यासाठी एकच गर्दी उडते . अतिशय सभ्य रीतीने पण आक्रमक आवेशात लोकं
लाइन लावतात. त्यातून पर्यटकांची गर्दी असेल तर तेव्हाचे हाल तर विशेष बघण्यासारखे
असतात. अत्यंत गोंधळलेल्या चेहऱ्याने आणि काहीश्या केविलवाण्या नजरेने कुठल्या
एक्सिट ने बाहेर पडायचं अशा विचारात हरवलेले व्हिसिटर्स जेव्हा लंडनकरांच्या
रस्त्यात घुटमळतात तेव्हा त्यांना बसणाऱ्या शिव्याशापांची त्यांना जाणीवही नसते आणि
पर्वाही ... या सगळ्या गदारोळातून कार्ड टॅप करून गेट मधून बाहेर पडताना हिरवा दिवा
पहिला कि मला अजूनही सुटकेचा निश्वास टाकावंसं वाटतं. नाहीतर पुन्हा ट्यूब च्या
स्थितप्रज्ञ कर्मचाऱ्याला शोधून, 'कार्ड टॅप झाला कि नाही ते बघा ओ जरा ' अशी आळवणी
करून, मागून येणाऱ्या लोकांच्या सभ्य नजरेतील शिव्या खात आणखी ५ मिनिटं खर्ची घालणं
आलं! बकिंगहॅम पॅलेस गार्डन च्या एक्सिट मधून बाहेर पडताना मला आपण एखाद्या
उंदीराप्रमाणे बिळातून बाहेर येत आहोत असा वाटतं.तसाही काळे कोट आणि जॅकेट्स
मधली,ऑफिस च्या दिशेने लगबगीने धावणारी माणसे उन्दिरांच्या सारखीच दिसत आहेत या
विचाराने मी स्वतःशीच हसते. पण बाहेर आल्या क्षणी एकदम ऍलिस ला जसं बिळातून बाहेर
पडल्यावर एकदम वेगळ्याच जगात आल्यासारखा वाटलं असेल तसं वाटतं. फ्रेश हवेचा झोका
आला कि गर्दीच्या वासांनी त्रासलेल्या नाकाला तरतरी येते. आणि समोरच्या वॉटर फाऊंटन
कडेपाहताना तर एकदम जग बिग काय ते सगळं एकदम थांबल्यासारखा वाटायला लागतं.
नुकताच पाऊस पडून गेलेला असतो. झकास ऊन पडलंय. ग्रीन पार्क च्या प्रशस्त
लॉनच्या हिरव्यागार चादरीवर दवबिंदू चमकत असतात.
पार्क मधल्या पायवाटांवरून तुरळक
माणसं लगबगीनं चालत जात असतात. उन्हाळ्यात हे पार्क नुसतं माणसांनी फुलून गेलेलं
असायचं . सगळी कडे पिकनिकस ची आणि फोटो सेशन्स करणाऱ्या माणसांची रेलचेल असायची.
स्टेशन मधून बाहेर पडला कि pram घेऊन निवांत फिरणाऱ्या लोकांमधून,धावपळ करणाऱ्या
लहानमुलांना चुकवत जाताना वाटायचं कि 'काय मजा आहे यांची!! आणि मी बघा .. ऑफिस ला
जातीये !!!'. पण आता सुट्ट्या संपल्या, शाळा सुरु झाल्यात त्यामुळे गर्दी एकदम कमी
झालीये . सप्टेंबर महिना सुरु झाला कि हे चित्र असंच एकदम पालटत. त्या गर्दीची आठवण
काढत मी डावीकडे वळते आणि सेन्ट जेम्स'स पॅलेस बाजूच्या रस्त्यावरून चालू लागते. हा
रस्ता फारच सुंदर आहे. डावी कडे अतिशय सुरेख स्थापत्यकला असलेल्या जुन्या इमारती
आणि उजवीकडे त्याहूनही जुने आणि भव्य असे प्लेन ट्री वृक्ष. त्या प्रचंड वृक्षांना
पाहीलं कि मला पडवीत पेपर वाचत बसलेल्या, थकलेल्या तरीही टवटवीत चेहेऱ्याच्या आजोबा
लोकांची आठवण येते. तशाच मायेने आजूबाजूला चालेल्या कोलाहलाकडे स्थितप्रद्न्य पणे
पाहत बसलेले! शरद ऋतूची चाहूल सुरु होतेय. अनेक पानांनी आपला रंग बदललाय. आधीच्या
हिरव्या रांगामध्येच केशरी-पिवळ्या-जांभळ्या छटाही दिसू लागल्यात.
एखादे चुकार पान
हळुवार वाऱ्याच्या झुळुकेनीही अलगद जमिनीवर पडते.
आणि त्याच्या चाहुलीने मोठ्ठ्या
ऐटीत बसून Nut खाणाऱी खारुताई एकदम चौकस होते . लंडन च्या पार्क्स मधल्या या खारी
भारीच धीट. चांगल्या खात्या घरच्या म्हणाव्यात अशा धष्ट-पुष्ट. आपल्या झुबकेदार
शेपट्या सावरीत इकडून तिकडे धावत असतात. फोटो साठी मस्त pose देण्यासाठी प्रसिद्ध
आणि कुणी खाणे देण्यासाठी हात पुढे केला तर सराईतपणे हातावर चालून खाऊ खातात. त्या
खारोटीची मजा पाहत मी मी चालता चालता मॉल रोड वर पोहोचते . उजवीकडे बकिंगहॅम पॅलेस
मोठ्या दिमाखात उभा असतो. ‘आत्ता वेळ नाहीये , नंतर भेटू’ असा क्विन ला सांगावे
लागेल , असा विचार करत मनाशीच हसते . पॅलेस वर नजर टाकीत आणि डावीकडून येणाऱ्या
गाडयांना चुकवीत मी सेंट जेम्स’स् पार्क मध्ये शिरते.
हि माझी अगदी लाडकी जागा.
तिथे गेल्याक्षणी मी सगळी गडबड आणि टेन्शन्स विसरूनच जाते . या छोट्याश्या पार्क
मध्ये खूप काही बघण्यासारखा आहे. छोटासा तलाव, त्यात थाई थाई नाचणारी कारंजी , त्यावरचा तो परिकथेतल्या सारखा छोटासाच पण ऐटदार पूल आणि बॅकग्राऊंड म्युझिकला पक्षांचा गोड चिवचिवाट. तलावात खूप सारी बदके , पेलिकन्स , राजहंस अगदी मनसोक्त डुंबत असतात . जॉगिंग करणारी माणसे ओळखीची नसली तरी हसून - गुड मॉर्निंग म्हणून पुढे जातात. खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या वातावरणात!
मी एका मोठ्ठ्या श्वासात ती
स्वच्छ हवा आणि vibe भरून घेते. पार्क कॅफे नुकताच ओपन होत असतो. तिथल्या कॉफी आणि
पेस्ट्रीज च्या वासाने एकदम भूक चाळवाते. पण त्या मोहाच्या क्षणावर मात करून मी गेट
मधून बाहेर पडते . आता एक-एक शासकीय इमारती येऊ लागतात. पुन्हा काळ्या कोटातल्या
लोकांची लगबग दिसू लागते. मी आपली एखाद्या स्वप्नातून जागे व्हावे तशी भानावर येते.
आणी दिवसभराच्या कामांची उजळणी करत चॅनेल४ च्या ऑफिस च्या पायऱ्या चढू लागते.
9 comments:
मला मीच प्रत्यक्ष अनुभवते आहे असे वाटले, मस्त,खूप छान, असेच लिहीत रहा, तुझ्याकडे लिहिण्याची कला आहे
Beautiful pictures and flowing narration.. thoroughly enjoyed
Chaan marathi taai
अतिशय सुंदर लिहिले आहेस. लिहीत जा
Thanks all!!
खूप छान!!!
फारच सुंदर लिहिलयंस धनू...
अॅलिसची गोष्ट ते पडवीतले आजोबा.. इथपर्यंतची एक सैर घडवून आणलीस.. वाह
Sunder likhan....👌
Thanks alot for such encouraging comments!!
Post a Comment